45 मिनिटांत निदान करणाऱ्या कोरोना चाचणी यंत्रांच्या खरेदीला निविदा प्रक्रियेचा फटका


मुंबई. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोनाची चाचणी अवघ्या ४५ मिनिटांत आरएनए शुद्धीकरण प्रणालीच्या यंत्रावर सोय आहे. अशी १० यंत्रे राज्य सरकार खरेदी करणार होते. मात्र सध्या या यंत्राची खरेदी निविदा प्रक्रियेत अडकली असल्याचा आरोप मुंबईचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रविवारी केला आहे.


हाफकिन जीव - औषध निर्माण महामंडळाने आरएनए शुद्धीकरण प्रणाली यंत्रे खरेदीची निविदा काढली होती. १४ मार्च २०२० रोजी ई- निविदा जारी केली होती. ज्याचा निर्णय २७ मार्च २०२० रोजी येणे अपेक्षीत होते. या एका यंत्राची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. मात्र अद्याप ही यंत्रे खरेदी झालेली नाहीत, असे सांगत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राला किमान १० स्वयंचलित यंत्राची आवश्यक आहेत. या एका मशिनवर एकावेळी २४ कोरोना चाचणी करता येते. तसेच ही मशीन ४५ मिनिटात अहवाल देण्यात सक्षम आहे. सध्या अहवाल तत्काळ न मिळाल्याने २ ते ३ दिवस संपूर्ण यंत्रणा ताटकळत राहते.


निधीमुळे अडकली खरेदी


वैद्यकीय संचालनालय तर्फे या १० मशिनच्या खरेदीसाठी निधी हाफकिनकडे तत्काळ येणे आवश्यक होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे या यंत्राच्या खरेदीचा निर्णयास मोठा विलंब होतो आहे, असा आरोप गलगली यांनी केला.