मुंबई. देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त सापडत असून मुंबई सगळ्यात मोठे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसत आहे. सोमवारी मुंबईत आणखी ५७ कोरोनाग्रस्त सापडले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२६ वर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’पासून काही फुटांवरच असलेल्या एका चहावाल्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या संपूर्ण भागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे तबलिगी जमातला गेलेल्यांनी आपली माहिती स्वतःहून द्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, तबलिगी जमातच्या मरकजला राज्यातील १,२२५ जण गेल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मात्र हे नागरिक आम्हाला सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे. याबाबत तबलिगीच्या नेत्यांशी चर्चा केली असून त्यांनी सहकार्य करावे, असे त्यांना सांगितले असता त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मरकजमध्ये सामील झालेल्यांना मुंबई पोलिसांचा इशारा
निजामुद्दीन येथे मरकजमध्ये सहभागी झालेल्या लोकांमुळे देशभरात कोरोना फैलावल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. परंतु अजूनही काही जणांनी माहिती न दिल्याने मुंबई मनपा आणि मुंबई पोलिसांनी आवाहन करतानाच कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने एक ट्विट करीत, ज्यांनी नवी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे, त्यांनी १९१६ या हेल्पलाइन नंबरवर फोन करून त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यावी. जे असे करणार नाहीत त्यांच्यावर भारतीय दंड विधान, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा दिला. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही असेच ट्विट करीत तसाच इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री स्वत:च चालवतात गाडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लागण सुरू झाल्याची माहिती येताच आपल्या चालकाला सुटी दिली आणि ते स्वतःच गाडी चालवत सगळीकडे जात आहेत. चहावाल्याच्या प्रकरणामुळे आता 'मातोश्री’वर सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती ‘मातोश्री’वरील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.